Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य
Maharashtra

राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य

राज्यातील बंदरांच्या विकासासंदर्भातील बैठकीचे प्रातिनिधिक चित्र

मुंबई | राज्यातील बंदरांची माल हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, नियामक बाबी, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या मुद्द्यांवर बंदर संचालकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. राज्यातील लहान बंदरांची माल हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात बंदरे विभागाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्सची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी, पोर्ट ऑपरेटर्स आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंबा नदी परिसर आणि जयगड बंदराचा विकास

अंबा नदी परिसरातील बंदराची सध्याची माल हाताळणी सुमारे २५.५ दशलक्ष टन असून, चालू वर्षात ती २६ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पोलाद प्रकल्पाची क्षमता वाढल्यानंतर प्रत्यक्ष माल हाताळणी ४३ दशलक्ष टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. वाढत्या जहाज वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नौका मागोवा प्रणालीच्या व्याप्तीत अंबा नदीचा समावेश करणे, अंबा नदीच्या प्रवेश कालव्याचे खोलीकरण आणि गॅस वाहिनीचे स्थलांतर या बाबींसाठी शासन सहकार्य करेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच जयगड बंदराची एकूण क्षमता ५५ दशलक्ष टन असून सध्या सुमारे ३५ दशलक्ष टन माल हाताळला जातो. उपलब्ध क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि पूल सुविधा विकसित करणे, कोकण रेल्वेची माल वाहतूक क्षमता वाढविणे आणि कोकण व मध्य रेल्वेच्या जाळ्यांमधील जोडणी मजबूत करणे आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांमुळे रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील उद्योग आणि रोजगाराला चालना मिळू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

उद्याोगविकास आणि विविध माल हाताळणीचे प्रस्ताव

ज्या बंदरांशी संलग्न उद्योग नाहीत, अशा बंदरांना मालवाहतुकीसाठी परिसरातील उद्योगांवर अवलंबून राहावे लागते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि संबंधित शासकीय विभागांनी बंदर परिसरात उद्योगविकासासाठी संयुक्त नियोजन करावे, अशी सूचना प्रतिनिधींनी केली आहे. या बैठकीमध्ये रेल्वे साइडिंगची क्षमता वाढविणे, वीज प्रकल्पांसाठी मालवाहतूक सुरू ठेवणे, तसेच कंटेनर, एलपीजी, रसायने, युरिया आणि साखर यांसारख्या व्यावसायिक मालाची हाताळणी वाढविण्याबाबतचे विविध प्रस्तावही मांडण्यात आले आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts