Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्याचे कनेक्शन, १२ शाळा संशयात
Nashik

नाशिकमध्ये १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्याचे कनेक्शन, १२ शाळा संशयात

नाशिक | राज्यभरातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. या गंभीर प्रकरणात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १२ शाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील एका अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या घरातून नाशिकमधील शाळांशी संबंधित बनावट शालार्थ आयडी तयार करण्यासंदर्भातील कागदपत्रे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त

धुळे जिल्ह्यातील एका संशयित आरोपीच्या घरात नाशिकमधील शाळांची कागदपत्रे आढळल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. या कागदपत्रांचा बनावट शालार्थ आयडी तयार करण्याशी नेमका काय संबंध आहे, संबंधित शाळांची भूमिका काय होती आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणाचा सहभाग होता, याचा सखोल तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे नाशिकमधील संबंधित शाळा, संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यभरात हजारो बनावट आयडी तयार

बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर प्रकार तपासात उघडकीस आला आहे. आतापर्यंत राज्यभरात एक हजारांहून अधिक बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात शिक्षक, संस्थाचालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक संशयित आरोपी कारागृहात आहेत. आता तपास यंत्रणा या १२ शाळांपर्यंत पोहोचते का आणि यात आणखी कोणाचे चेहरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts