नाशिक | सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जागांवर लागू नव्या रोटेशन धोरणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे राज्य शासनाने नव्याने केलेल्या रोटेशन पद्धतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आगामी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही मतदारसंघात कायमस्वरूपी आरक्षणाला हक्क नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने सरकारच्या धोरणाला मान्यता दिली आहे.
नवीन रोटेशन पद्धती आणि ५० टक्के मर्यादा
या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता नाशिक जिल्हा परिषदेत नव्याने रोटेशन पद्धतीने आरक्षण राहणे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना जिल्हा परिषदेतील एकूण आरक्षित जागांची संख्या ७४ पैकी ३७ जागांवर म्हणजेच ५० टक्क्यांवर आणणे कायद्याने बंधनकारक ठरणार आहे. महायुती सरकारने नवीन रोटेशन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला राज्यभरातून विरोध केला गेला होता.
ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का
संवैधानिक तरतुदींनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर असल्यामुळे त्यात कपात करता येत नाही. जिल्ह्यात आदिवासी आणि अनुसूचित जातींची लोकसंख्या मोठी असल्याने अनुसूचित जमातीच्या २९ आणि अनुसूचित जातीकरिता ५ अशा एकूण ३४ जागा आधीच आरक्षित होतात. ५० टक्क्यांच्या कमाल मर्यादेनुसार एकूण आरक्षित जागा ३७ असू शकतात, ज्यामुळे ओबीसींच्या वाट्याला १९ पैकी थेट १६ जागा घटून केवळ ३ जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
Source: Cosmo News Desk







