नाशिक | अंबड औद्योगिक वसाहतीमधील भूजल आणि पृष्ठभागावरील पाण्यात घातक क्रोमियम व हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळल्याची घटना ताजी असतानाच आता सातपूर औद्योगिक वसाहतीतही रासायनिक प्रदूषणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सातपूर एमआयडीसीतील एका औद्योगिक युनिटमधून पिवळसर रंगाचे रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यालगत खोदलेल्या कच्च्या खड्ड्यात सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रयोगशाळा तपासणीत घातक जड धातू निष्पन्न
सातपूर एमआयडीसीच्या प्रयोगशाळा तपासणीत हेक्साव्हॅलेंट क्रोमियमसह शिसे, कॅडमियम, आर्सेनिक आणि पारा यांसारख्या घातक जड धातूंचे अंश आढळले आहेत. सातपूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एसएस-५१ येथील एका युनिटमधून पाइपद्वारे प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यालगतच्या कच्च्या खड्ड्यात सोडले जात असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार, संबंधित पाण्यात हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण १.१६ मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळले असून, इतर जड धातूंचे अंशही समोर आले आहेत.
गोदावरी नदी आणि भूजल प्रदूषणाचा धोका
विशेष म्हणजे, सातपूर परिसरातील नैसर्गिक नाले पुढे रामकुंडाच्या वरच्या बाजूला गोदावरी नदीला मिळतात. त्यामुळे या नाल्यांमधून वाहणारे रासायनिक सांडपाणी नदीत मिसळण्याबरोबरच जमिनीत झिरपून भूजल प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराचे गांभीर्य वाढले असून, संबंधित रासायनिक सांडपाणी सोडणारे उद्योग तातडीने बंद करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपेपर्यंत नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये, यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी रोशन केदार आणि प्रवीण शिलावट यांनी केली आहे.
Source: Cosmo News Desk





