नाशिक | शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये विनापरवानगी होर्डिंग्ज, बॅनर्स आणि फ्लेक्स लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (दि. १६) सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील सहा विभागांतून तब्बल १२३ अनधिकृत फलक जप्त करण्यात आले आहेत. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाई आणि नागरिकांच्या तक्रारी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात शुभेच्छा देणारे बॅनर्स, होर्डिंग्ज आणि फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, चौक तसेच वाहतूक मार्गावर लावण्यात येणाऱ्या या फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी वाहनचालकांची दृश्यमानता कमी होऊन अपघातांचा धोका वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात ही धडक कारवाई हाती घेतली.
विविध विभागांनुसार कारवाईचा तपशील
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील सहाही विभागांत पथके तैनात केली आणि कारवाई केली. यामध्ये नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक २८ फलक जप्त करण्यात आले. याशिवाय पंचवटीत २३, सातपूरमध्ये २०, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिममध्ये प्रत्येकी १८, तर नवीन नाशिक विभागात १६ अनधिकृत फलक हटवण्यात आले. शहराचे विद्रूपकरण रोखण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, विनापरवानगी फलक लावणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिला आहे.
Source: Cosmo News Desk






