नाशिक | राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२५-२६ च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांसाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा शिक्षकांची निवड झाली असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासह आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, आदर्श शिक्षिका आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी त्यांनी हे मानांकन मिळविले आहे.
विविध प्रवर्गातून निवड झालेले शिक्षक
प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवीचामाथा (ता. निफाड) येथील देवेंद्र वसंतराव वाघ यांची निवड झाली आहे. माध्यमिक शिक्षक प्रवर्गातून सातपूर, नाशिक येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विनीत धर्मराज पवार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रवर्गात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जऊळके दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील नरेंद्र तुकाराम सोनवणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरटेंभे (ता. इगतपुरी) येथील अतुल अशोकराव आहिरे यांची निवड झाली आहे.
आदर्श व क्रीडा शिक्षक पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोकणगाव (ता. निफाड) येथील शीतल नागोराव बावने यांची निवड करण्यात आली आहे. विशेष शिक्षक क्रीडा प्रवर्गातून पेठे विद्यालय, रविवार कारंजा (नाशिक) येथील अमोल सुधाकर जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी १९६२-६३ पासून राज्यात ही योजना राबवली जात असून, यंदाच्या पुरस्कारांचे वितरण ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. दरम्यान, राज्यभरातून विविध आठ प्रवर्गांतून एकूण १२३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
Source: Cosmo News Desk





