Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन
Maharashtra

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

गडचिरोलीत हॉस्पिटल ऑन व्हील्स प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री

गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (फिरते रुग्णालय) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांचा उपचारासाठी होणारा लांबचा प्रवास, वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट

जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि मुलचेरा या आदिवासीबहुल तालुक्यांतील अनेक गावांमध्ये दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आणि पावसाळ्यात दळणवळणाच्या अडचणींमुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे येतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून ४ कोटी ९९ लाख रुपयांचा हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून, याद्वारे आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज फिरते रुग्णालय निश्चित वेळापत्रकानुसार दुर्गम गावांमध्ये पोहोचणार आहे.

या फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि औषधवाटप गावपातळीवर केले जाणार आहे. माता व बाल आरोग्य, हिवताप, क्षयरोग आणि कुपोषण यांसारख्या समस्यांचे लवकर निदान करून वेळेवर उपचार करण्यावर विशेष भर दिला जाईल. तसेच गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी नजीकच्या आरोग्य संस्थेत पाठविण्यात येणार आहे.

रुग्णवाहिका सेवेसाठी अतिरिक्त निधी

फिरत्या रुग्णालयासोबतच दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही आरोग्यसेवांसाठी एकूण ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे खनिज बाधित क्षेत्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य दिले जात आहे. या प्रकल्पामुळे दुर्गमतेमुळे आरोग्यसेवेपासून दूर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच प्राथमिक उपचार व तपासणीच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts