नंदुरबार | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती निमित्त नंदुरबार येथे आयोजित जनजाती गौरव दिन कार्यक्रमात आदिवासी समाजाचे जल, जंगल आणि जमिनीवरील पारंपरिक हक्क, संस्कृती व स्वाभिमानाचे संरक्षण करणे ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाला ऑनलाईन उपस्थिती लावली. भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला आणि १५ नोव्हेंबर १८८५ मधील त्यांच्या जन्म व इतिहासाची माहिती दिली.
डिजिटल पोर्टलचे अनावरण व शासकीय योजनांचे लाभ वाटप
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या ‘डिजिटल इन्फॉर्मेशन वनसंपदा पोर्टल’चे अनावरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी साहित्य खरेदी अर्थसहाय्य, विविध व्यवसायांसाठी ८५ टक्के व १०० टक्के अनुदान, ठिंबक सिंचन साहित्य खरेदी अर्थसहाय्य, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेतंर्गत कर्ज सहाय्य, शिलाई मशिन, महिला बचत गटांना १० हजार रुपये अर्थसहाय्य, तसेच वैदू प्रमाणपत्र, सातबारा व वनपट्टे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांनाही गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते, ज्यांना पालकमंत्र्यांनी भेट दिली.
६५ कोटी रुपयांच्या शासकीय इमारतींचे ऑनलाईन लोकार्पण
गडचिरोली येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कोटी रुपये खर्चाच्या सात शासकीय इमारतींचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. यात तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा शालेय इमारत, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, बोरद येथील आश्रमशाळा इमारत, अक्कलकुवा तालुक्यातील दहेल येथील मुलांचे वसतिगृह, तसेच धडगाव तालुक्यातील रोषमाळ येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेची इमारत व मुलांच्या वसतिगृहाचा समावेश आहे. या सात इमारतींच्या लोकार्पणामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा व सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध होणार असून शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. प्रास्ताविकात सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या जनजाती गौरव सप्ताहातील उपक्रमांची माहिती दिली.
Source: Cosmo News Desk











