नाशिक | द्वारका सर्कल येथून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील नेहमीची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. या मार्गामुळे वाहनचालकांचा पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचा त्रास वाचला असून प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. शालिमार आणि सीबीएस परिसराmdan येणाऱ्या नागरिकांना आता थेट द्वारकामार्गे नाशिकरोडला जाता येणार आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका आणि पर्यायी मार्गाची मुक्ती
यापूर्वी द्वारका ते नाशिकरोड मार्ग बंद असल्यामुळे वाहनचालकांना मुंबई नाका, वडाळा नाका चौक आणि सह्याद्री हॉस्पिटलमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. या पर्यायी मार्गावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. त्यामुळे वाहनचालकांना अतिरिक्त वेळ आणि इंधन खर्च करावे लागत होते. आता शालिमार आणि सीबीएसकडून नाशिकरोडला जाणाऱ्या वाहनचालकांना वडाळा नाका मार्गे वळसा घालण्याची गरज उरलेली नाही.
भुयारी मार्गाचे काम व पोलिसांचे आवाहन
द्वारका सर्कलपासून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग खुला झाला असून, काठे गल्लीतून नाशिक शहराच्या दिशेने येणारा मार्ग यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी मार्ग सुरू झाल्याने वाहनांची विभागणी होऊन मुख्य चौकातील गर्दी कमी होण्यास हातभार लागला आहे. याचा प्रामुख्याने दुचाकी, चारचाकी आणि खाजगी प्रवासी वाहनांना फायदा होत आहे. दरम्यान, द्वारका सर्कल येथे काठे गल्ली ते सारडा सर्कलदरम्यान भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि भुयारी मार्गाच्या कामाच्या ठिकाणी सावधानी बाळगावी, असे आवाहन वाहतूक शाखा युनिट क्र. ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk






