अमरावती | निमकुंडसह मेळघाटातील प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचवला जाणार आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून हा विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अचलपूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी निमकुंड गावात पालकमंत्री बावनकुळे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली आणि गृहोपयोगी साहित्याचे वाटप करून जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’चा शुभारंभ केला. यावेळी आमदार प्रवीण पोटे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, नगराध्यक्ष रुपाली माथने, सरपंच रत्ना नागले, उपसरपंच अनिल अकोले, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.
पाणी पुरवठा योजना आणि विकासात्मक घोषणा
निमकुंड गावासाठी ३ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चातून नवीन पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच ५० लाखांच्या निधीतून गावात विविध विकास कामे राबवली जातील. गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा होत असून यादरम्यान मेळघाटातील सर्व आदिवासी गावांमध्ये शासनाचे कल्याणकारी प्रकल्प पोहोचतील. बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे शासनाचे धोरण आहे.
आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
पालकमंत्री बावनकुळे यांनी गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ केला आणि चहापान घेतले. त्यांनी आठवले कुटुंबातील जसाय, सुनीता, अंश आणि आरोह यांची आस्थेने विचारपूस करत अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी समस्त गावकऱ्यांसाठी फराळ आणून तो प्रेमाने वाटला. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. उपसरपंच अनिल अकोले यांनी स्वागतपर भाषण केले, आमदार केवलराव काळे यांनी प्रास्ताविक केले तर आमदार प्रवीण पोटे यांनी मार्गदर्शन केले.
Source: Cosmo News Desk











