नाशिक | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांचा मोठा भडका उडाला. फटाके वाजवताना उडवलेल्या ठिणक्यांमुळे शहरातील विविध भागांत तब्बल ४० ठिकाणी आग लागल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या २४ घटना घडल्या होत्या. यंदा त्यात १६ घटनांची वाढ झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ केली.
विविध भागांत आगीच्या घटना
काळाराम मंदिर परिसर, मदिना चौकातील भंगाराचे गोदाम, सातपूर, अंबड, नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, पंचवटी आणि कॉलेज रोड परिसरात आगीच्या घटना घडल्या. बहुतांश घटनांमध्ये नारळाच्या झाडांनी तसेच परिसरातील गवतने पेट घेतल्याचे समोर आले. काही ठिकाणी फटाक्यांच्या ठिणक्या झाडांवर, गवतवर आणि मोकळ्या जागेतील ज्वलनशील वस्तूवर पडल्याने आग लागली. तसेच मुंबई नाका पोलिस ठाण्याजवळील वझिरे मळा परिसरात रविवारी रात्री ९ च्या सुमारास भंगार गोदामाला आग लागली. या आगीत भंगार साहित्याचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाची कारवाई
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व घटनांसाठी एकूण २१ अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला. एकाच वेळी विविध भागांतून आगीचे कॉल येत असल्याने उपलब्ध मनुष्यबळ आणि वाहनांचे नियोजन करणे जवानांसाठी आव्हानात्मक ठरले होते. दिवाळीच्या उत्सवात फटाके फोडताना नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळण्याची गरज या घटनांमुळे अधोरेखित झाली आहे.
Source: Cosmo News Desk





