सातारा | निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला असताना, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. माण तालुक्यातील पिंपरी गावात झालेल्या या कार्यक्रमात कोणताही औपचारिक मंच किंवा मानपानाचा बडेजाव नव्हता, तर शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर पालकमंत्री शेतकऱ्यांसोबत बसले होते. यावेळी गावकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करत त्यांनी मनमोकळा संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अग्रिम मदत आणि पुढील मदत
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, ही मदत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना सणाच्या काळात दिलासा मिळावा या उद्देशाने आहे. ही कोणतीही अंतिम मदत नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचे अहवाल प्राप्त होतील आणि त्यानंतर शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना पूर्ण मदत प्रदान केली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर ठेवावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. आपणही यंदा साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याचे सांगत, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी आपुलकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, शेखर गोरे यांच्यासह पिंपरी गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











