पालघर | दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये, कारण राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व zआवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येतील, अशी महत्त्वाची ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक अजित साबळे, नायब तहसीलदार डॉ. बाळाराम भला यांच्यासह इतर अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हट्टीपाड्यात शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी
राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीचे नियोजन करण्यासाठी चोवीस तासांहून कमी वेळ मिळाला होता, तरीही ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी केला. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असतानाही आदिवासी समाजाने संस्कृती जपत उत्साहात स्वागत केले, ज्याबद्दल त्यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जालना व मराठवाड्यात ज्याप्रमाणे सण साजरा होत आहे, त्याचप्रमाणे हट्टीपाड्यात येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ग्रामस्थांना दिवाळी फराळाची भेट देण्यात आली.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांना चार दिवसांत मिळणार मदत
शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे असल्याची शासनाला जाणीव असून नुकसानाची भरपाई मिळवून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या प्राथमिक स्वरूपातील पाच हजार रुपयांच्या मदतीअंतर्गत अनेक बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पुढील चार दिवसांत मदत मिळवून दिली जाईल. ई-केवायसी किंवा तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट पाड्यावर येऊन विशेष शिबिर आयोजित करावे, अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. शेतकऱ्यांनी कार्यालयात चकरा मारण्याऐवजी अधिकाऱ्यांनीच दारात जावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
Source: Cosmo News Desk










