Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी शेतकऱ्यांसमवेत साजरी केली दिवाळी
Maharashtra

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी शेतकऱ्यांसमवेत साजरी केली दिवाळी

अकोला जिल्ह्यातील गोर्धा गावात शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी करताना पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला | राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी भेट दिली. या गावातील शेतकऱ्यांसमवेत त्यांनी दिवाळी साजरी केली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला. या दौऱ्यादरम्यान आमदार प्रकाश भारसाकळे, हिवरखेडच्या नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे, तेल्हारा येथील नगराध्यक्ष वैशालीताई पालीवाल, संतोष शिवरकर, सरपंच भारती थोरात, आणि ज्येष्ठ नागरिक विनायकराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, महिला आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील शेतकरी, शेतमजूर आणि महिला भगिनींचा फराळ व साडी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी शेतकरी गजानन परनाटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि फराळ केला. गावकऱ्यांनी गावात येऊन दिवाळी साजरी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

शेतकऱ्यांना शासनाची खंबीर साथ

राज्यात दुष्काळाचे संकट उद्भवले असून शेतकऱ्यांनी या काळात डगमगून जाऊ नये, राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मदतीची वाट न बघता तातडीने अग्रीम मदत जाहीर केली असून तिचे वाटप वेगाने सुरू आहे. दुष्काळबाधितांना टप्प्याटप्प्याने सर्व आवश्यक मदत दिली जाईल आणि शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. श्री हनुमान मंदिर येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी शेतकरी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

दुष्काळमुक्तीसाठी नदीजोड प्रकल्प

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्पाचे पाणी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचवले जाईल, ज्यामुळे संपूर्ण विदर्भातील कोरडवाहू प्रदेश कायमचा दुष्काळमुक्त होईल. याशिवाय समाजातील सर्व घटकांसाठी विविध आवास योजना, लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याची माहितीही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

Source: Cosmo News Desk

Related Posts