नाशिक | समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका शासकीय कार्यकारी अभियंत्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी अभियंता खान अब्दुल फरीद अब्दुल हमीद हे आपल्या इनोव्हा वाहनाने चालकासह छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे निघाले होते. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी समृद्धी महामार्गावर आली असता एका एर्टिगा कारमधून आलेल्या संशयितांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. फळेगाव-विरुद्धपाडा परिसराजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांना खाली उतरवले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने स्वतःच्या गाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले.
अपहरण आणि लूटमार
अभियांत्याचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल फोन बळजोरीने हिसकावून घेतला. यानंतर त्यांच्या चालकाला घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, इगतपुरी येथील चॅनेल क्र. ६१५ जवळ सोडून देण्यात आले. लूटमार केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तपास चक्र वेगाने चालवली.
पाच जण अटकेत
पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे छडा लावत थेट छत्रपती संभाजीनगर गाठले आणि तेथून पाच संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश मदनसिंग उसारे (२३), गोपाल कमलालाल बनमावत उर्फ राजपूत (२४), लहू जयसिंग बारवार (१८), दुर्गेश ताराचंद फटपुरे (२४) आणि आकाश बाबुलाल शेवाळे (२१) अशी आहेत. समृद्धी महामार्गावर भरदिवसा घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनांचा पाठलाग करून नागरिकांना लुटण्याच्या घटना रोखण्यासाठी महामार्गावर नियमित पोलिस गस्त, प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन मदतव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.
Source: Cosmo News Desk










