नाशिक | शहरातील द्वारका व सारडा सर्कल परिसरातील सुमारे ६० वर्षे जुनी आणि जीर्ण झालेली जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची जुनी इमारत आता इतिहासजमा होणार असून, या मोक्याच्या जागेवर १० मजली अत्याधुनिक ‘सहकार संकुल’ उभारले जाणार आहे. सहकार क्षेत्राचे बळकटीकरण आणि प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्याच्या उद्देशाने ६६ कोटी ६१ लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चधिकार समितीने अंतिम मान्यता दिली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या प्रकल्पामुळे मोठे यश आले असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
एकाच छताखाली सर्व कार्यालये आणि भाड्याची बचत
सध्या नाशिक शहरात विविध ठिकाणी सहकार विभागाची ६ प्रमुख कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये विखुरलेली आहेत. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना एकाच कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पायपीट करावी लागते. हे नवीन १० मजली संकुल उभे राहिल्यानंतर सहकार विभागाची ही सर्व सहाही कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे प्रशासकीय समन्वय वाढणार असून, दरमहा शासकीय भाड्यापोटी खर्च होणारा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांहून अधिक निधी कायमस्वरूपी वाचणार आहे. जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात पाण्याची गळती आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आता संपणार आहे.
अशी असेल सहकार संकुलाची आधुनिक रचना आणि सुविधा
हे प्रस्तावित सहकार संकुल तळघर, स्टिल्ट फ्लोअर आणि १० मजले असे एकूण ८,०८०.९० चौरस मीटर क्षेत्रफळाचे सुसज्ज व सुरक्षित असणार आहे. या इमारतीत ५ वेगवान लिफ्ट्स, प्रशस्त वाहन पार्किंग, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, बैठक सभागृह, निवडणूक कक्ष आणि आयत्यासाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष अशा विविध आधुनिक सुविधांचा समावेश असेल. याशिवाय, पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इमारतीवर रूफटॉप सोलर यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सर्वसमावेशक अग्निशामक सुरक्षा यंत्रणा देखील बसविण्यात येणार आहे.
Source: Cosmo News Desk






