हिंगोली | राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्याच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान आरोग्य विभागातील अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसमत रुग्णालयातील सुविधांचा आढावा
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. त्यांनी प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, आयुष्मान भारत योजना, ईसीजी सुविधा आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कक्षांची पाहणी केली. महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली व अडचणी जाणून घेतल्या. वसमत येथे प्रस्तावित १०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून स्त्री शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती विभाग, औषधी भांडार, लसीकरण कक्ष, अंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागाला त्यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे आणि योजनांचा लाभ पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
हृदयविकारग्रस्त बालकांशी संवाद आणि शासकीय योजना
जनसंवाद यात्रेदरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महिला रुग्णालय, वसमत येथे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बाल लाभार्थ्यांशी आस्थेने संवाद साधला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना नवजीवन मिळाल्याचे सांगत त्यांनी या कार्याचा गौरव केला. बालकांच्या प्रकृतीची विचारपूस करून पालकांशी संवाद साधत त्यांच्या अनुभваंची माहिती घेण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गरजू बालकांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या योजनेमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्याची नवी संधी मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या सर्व दौऱ्यात आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk











