Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ३४ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण
Maharashtra

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ३४ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करताना

छत्रपती संभाजीनगर | शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झालेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या बससेवेसह महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण शिलाफलकांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आधुनिक बससेवा आणि चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

शहरातील नागरिकांना आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवा मिळण्याच्या दृष्टीने नव्याने समाविष्ट झालेल्या या वातानुकूलित इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सोमवार, दि. २ नोव्हेंबरपासून या बस प्रवासी सेवेत दाखल होणार असून शहरातील विविध मार्गांवर त्यांचे संचालन केले जाणार आहे. या बस नऊ मीटर लांबीच्या असून प्रत्येकी ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा व जलद चार्जिंग यांसारख्या सुविधा या गाड्यांमध्ये उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह शहरातील वायुप्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. महानगरपालिकेने पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन आणि बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ई-व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली असून यांचेही लोकार्पण करण्यात आले. भविष्यात शहरात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन असून सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

शाळा इमारत आणि दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी

या कार्यक्रमादरम्यान महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते झाले. देवगिरी व्हॅली परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या व क्रीडांगण यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर व महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. या सर्व प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्यासह शाश्वत शहरी विकासाला मोठी चालна मिळणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts