नाशिक | हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा लाभलेल्या आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव आहे. या श्रद्धेच्या महासंगमाला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आधुनिकतेची जोड देऊन आगामी सिंहस्थ कुंभपर्व नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
गोदावरी महाआरती आणि ऐतिहासिक वारसा
या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतात धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळ्यांची प्राचीन परंपरा असून सुमारे १४०० वर्षांपूर्वीही लोक मोठ्या श्रद्धेने अशा आयोजनांमध्ये सहभागी होत असत. महाराष्ट्राची भूमी ही अमृतभूमी असून महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्राने देशाला सामाजिक समता आणि परिवर्तनाची दिशा दिल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील ६५० गावांमधील साडेसहा हजार जनजाती बांधव सहभागी झाले होते.
विकासकामे आणि पर्यावरण संवर्क्षणाचा संकल्प
दुष्काळी परिस्थितीचा संवेदनशीलतेने उल्लेख करताना केंद्र व राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना आवश्यक मदत करेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आगामी सिंहस्थासाठी जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे भविष्याला नवी दिशा देतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभगीत, संकेतस्थळ आणि विशेष टपाल तिकिटांचे विमोचन करण्यात आले.
Source: Cosmo News Desk










