Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थाचा शंखनाद आणि धर्मध्वजारोहण
Maharashtra

नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थाचा शंखनाद आणि धर्मध्वजारोहण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकमधील रामतीर्थावर झालेला धर्मध्वजारोहण सोहळा

नाशिक | गोदावरीच्या पावन तीरावर वैदिक मंत्रांचा मंगलघोष आणि शंखनादाच्या निनादात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकवून नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय प्रारंभ झाला. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या सोहळ्याने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णक्षण नोंदवला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य, साधू-संत तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण केली आणि जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करून धर्मध्वजेला वंदन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, जयकुमार रावल, संजय सावकारे, नरहरी झिरवाळ, नितेश राणे आदी मंत्री उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभपर्व आणि धर्मध्वजाचे महत्त्व

सिंहस्थ कुंभपर्व म्हणजे केवळ बारा वर्षांनी भरणारा मेळा नसून भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला स्पर्श करणारा श्रद्धेचा महासंगम आहे. या सोहळ्यात जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, श्रीमहंत ज्ञानदास महाराज, श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, श्रीमहंत राजेंद्रदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते. सिंहस्थ धर्मध्वजावर विविध शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे. या ध्वजावरील अमृतकुंभ अमरत्व, मुक्ती आणि देवी शक्तीचे प्रतीक आहे. तसेच ओमकार सकारात्मकतेचे प्रतीक असून, ‘श्री’ हे अक्षर विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. ध्वजावरील बारा रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे आणि संघशक्तीचे प्रतीक मानले जातात.

आगामी कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या या धर्मध्वजारोहणामुळे आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला विशेष अधिष्ठान लाभले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज होत आहे. भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध यंत्रणांकडून नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts