मुंबई | महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी उजनी जलाशय परिसरात राज्यातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटर प्रकल्पासह तरंगती सौर ऊर्जा आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून सिंचन सुविधा बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्हा औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी येणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील हा पहिला प्रकल्प ठरणार आहे.
स्वच्छ ऊर्जा आणि डेटा सेंटरची वैशिष्ट्ये
प्रस्तावानुसार उजनी येथे सुमारे २ हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या सौर ऊर्जेच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी १ हजार ८०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम कार्यान्वित केली जाईल, ज्यामुळे ग्रीड स्थिरतेला मदत मिळेल. तसेच टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. जलाशयाच्या पूर्ण संचय पातळीपैकी ३ हजार हेक्टर क्षेत्र म्हणजेच केवळ ९ टक्के क्षेत्र या फ्लोटिंग सोलर प्रकल्पासाठी वापरले जाणार असून उर्वरित ९१ टक्के क्षेत्र पूर्णपणे खुले राहील.
पाणी बचत, शेतकरी व मच्छीमारहित संरक्षण
प्रकल्पासाठी कमाल वार्षिक पाणी मागणी केवळ ०.४२ ते ०.५ टीएमसी इतकी मर्यादित असणार आहे. उजनी जलाशयाचे वार्षिक बाष्पीभवन १५.९ टीएमसी असून सौर पॅनेल्सच्या सावलीमुळे सुमारे १.५ टीएमसी पाण्याची वार्षिक बचत होणार आहे. विद्यमान पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि ५ लाख शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांना कोणताही बाधा येणार नाही व पाणी वाटपात कपात होणार नाही. तसेच माढा तालुक्यातील भीमनगर येथील ३११ कुटुंबांना ५१.१८ एकर क्षेत्र विनामोबदला देऊन हक्काची जागा देण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांच्या हिandीचे रक्षण करण्यासाठी मत्स्यविकासाची निविदा तात्काळ रद्द करण्यात आली असून, प्रकल्पामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास दरवर्षी १८० कोटी रुपये उत्पन्न मिळून सिंचन सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापरले जाईल.
Source: Cosmo News Desk











