बुलढाणा | दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांना रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे (हडपसर) या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबतची माहिती रेल्वेमंत्र्यांनी पत्राद्वारे दिली आहे.
विशेष गाड्या आणि अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
दिवाळीच्या काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या आणि फेऱ्यांचे नियोजन केले आहे. नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर ८ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्याशिवाय आणखी ८ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे. तसेच नागपूर-पुणे (हडपसर) मार्गावर १७ विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार असून, या मार्गावर २४ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
इतर मार्गांवरही विशेष रेल्वे गाड्या
या प्रमुख मार्गांव्यतिरिक्त शेगाव, नाशिक, अमरावती, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि उधना या मार्गांवर १८ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आणखी १३ रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पत्रात स्पष्ट करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
Source: Cosmo News Desk






