Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभात वाढ
Maharashtra

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभात वाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शासन निर्णय

मुंबई | विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. महागाई निर्देशांकानुसार योजनेतील भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, ज्याचा अधिकृत शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे.

शहरांनुसार मिळणार निधी

शिक्षणाच्या ठिकाणानुसार विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ दिला जाणार आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण ८० हजार रुपये मिळतील. इतर महसूल विभागीय शहरांतील तसेच उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६८ हजार रुपये मिळणार आहेत.

तसेच, अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५७ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये मिळतील. या रकमेमध्ये भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्याचा समावेश आहे. याशिवाय वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये ठोक स्वरूपात दिले जातील.

योजनेचा उद्देश आणि अटी

सततचे स्थलांतर आणि उत्पन्नाच्या साधनांचा अभाव यामुळे व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलताना अडचणी येतात. या विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात यासाठी शासनाने हे सुधारित लाभ मंजूर केले आहेत.

या योजनेच्या इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts