मुंबई | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पास ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखل घेतली गेली आहे. नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय येथे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधिक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टूरझिमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा आणि मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे उपस्थित होते.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि निधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत ‘स्पेशल असिस्टंस टू स्टेटस फॉर कॅपीटल इन्हव्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू ग्लोबल स्केल’ या योजनेअंतर्गत विकसित केला गेला आहे. यासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटी रुपये तर महाराष्ट्र शासनाने ११२.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पर्यटन विभागातंर्गत एमटीडीसीमार्फत मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ हा पाणबुडी पर्यटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. एक्स-आयएनएस गुलदार ही नौका तब्बल ३९ वर्षे राष्ट्रसेवा बजावून १२ जानेवारी २०२४ रोजी निवृत्त झाली होती आणि १९ मे २०२६ रोजी ती सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे २२ मीटर खोलीवर समुद्रतळावर ठेवण्यात आली.
सागरी जैवविविधता आणि पर्यटन
पर्यटन सचिव संजय यादव यांनी सांगितले की, हा पुरस्कार महाराष्ट्राच्या नाविन्यपूर्ण पर्यटन विकासाच्या प्रयत्नांचा गौरव आहे. या प्रकल्पामुळे सागरी वारशाचे संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटन आणि पर्यटकांना अनोखा अनुभव मिळणार आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे स्थानिकांना व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक आणि मार्गदर्शक सेवांमध्ये चालна मिळेल. अमेरिकेतील युएसएस ऑरिस्कन आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक स्थळांपासून प्रेरणा घेत हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे. जेट्टीवरुन स्पीडबोटद्वारे निवती रॉक येथे पोहोचून पर्यटकांना पाणबुडी किंवा स्कूबाद्वारे व्रेक डायव्हिंग, सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कूबा डायव्हिंग, प्रमाणित डायव्हर मोहिमा, अंडरवॉटर फोटोग्राफी आणि सागरी शिक्षण घेता येणार आहे.
Source: Cosmo News Desk





