Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा: अतुल सावे
Maharashtra

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा: अतुल सावे

पुणे यशदा येथे मार्गदर्शन करताना मंत्री अतुल सावे आणि उपस्थित अधिकारी

मुंबई | शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.

पुण्यातील यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी विविध महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रशिक्षण शिबिराची प्रमुख उपस्थिती आणि स्वरूप

या कार्यक्रमास भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, तसेच राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे आणि शरद माकर प्रमुख उपस्थित होते. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

योजनांच्या अंमलबजावणीवर भर

मंत्री श्री. सावे यांनी सांगितले की, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल. प्रशिक्षण शिबिरात विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाशी सुसंगतपणे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक गती देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी स्पष्ट केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts