Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
Maharashtra

तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा नरिमन पॉईंट येथे मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना

मुंबई | अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढीसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून, या समस्येचा मुकाबला करण्यासाठी तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी नरिमन पॉईंट येथील कार्यक्रमात केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘नशामुक्त भारत – फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या रॅलीचे गुजरातकडे प्रस्थान झाले असून ती स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर उपस्थित होते. याशिवाय विविध राज्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नशामुक्त भारत अभियान आणि पोलिसांचे कार्य

राज्यपालांनी अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासोबतच मागणी कमी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देण्याची गरज व्यक्त केली. विद्यापीठांचे कुलपती म्हणून महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ हाती घेण्यात आले असून शैक्षणिक परिसर व्यसनमुक्त ठेवण्यासाठी तयार केलेल्या विशेष पोर्टलद्वारे हजारो विद्यार्थ्यांनी शपथ घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना त्यांनी गडचिरोलीतील नक्षलवादी कारवाया नियंत्रणात आणण्यात आणि जिल्हा महत्त्वाचे पोलाद केंद्र म्हणून विकसित करण्यात पोलिसांच्या योगदानाची माहिती दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे एकसंध भारताचा पाया रचला गेला असून राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी सदैव सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोटारसायकल रॅलीचा उद्देश आणि सहभाग

राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकतानगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर राष्ट्रीय एकता परेड होत असून, यंदा ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस प्रतिनिधी आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे जवान या रॅलीत सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात के.सी. महाविद्यालय, एच आर महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, एच.एस.एन.सी. विद्यापीठ, विल्सन महाविद्यालय आणि पुरुषोत्तम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रोशन शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर समादेशक संजय जाधव यांनी आभार मानले.

Source: Cosmo News Desk

Related Posts