मुंबई | उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सध्या सुरू असून आतापर्यंत एकूण २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता झिरो चलन सुविधेचा लाभ घेत आपले परीक्षा अर्ज दाखल केले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने शासनाने परीक्षा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी आणि पात्र विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. विभागाकडून या संपूर्ण प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागू नये यासाठी झिरो चलन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व विद्यापीठांनी यासंदर्भातील परिपत्रके देखील जारी केली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते शुल्क परत करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. कोणताही पात्र विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठांमधील संपर्क अधिकारी
विद्यार्थ्यांना यासंदर्भात कोणतीही शैक्षणिक अडचण आल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ किंवा जनसंपर्क अधिकारी, विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९) आणि जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७) यांच्याशी संपर्क साधता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४) आणि अजय ठुबे (७५८८१६९१३४) उपलब्ध आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरसाठी संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९) व अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०) यांच्याशी संपर्क साधावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी संचालक डॉ. अंधारे (९९७५०५५१५५) व डॉ. काळवणे (७०२०६३४५०२) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
Source: Cosmo News Desk





