मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या विविध मुदतीच्या आणि कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधीन राहून केली जाणार आहे. यामध्ये ५ वर्षे, १३ वर्षे, १७ वर्षे आणि २३ वर्षे मुदतीच्या रोख्यांचा समावेश असून या कर्जाद्वारे मिळणारी रक्कम शासनाच्या विकास कामांसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी वापरली जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव (वित्तीय सुधारणा) विजय वाघमारे यांनी दिली आहे. या सर्व कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी १ डिसेंबर २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथील कार्यालयात लिलाव पार पडणार आहे.
सर्व रोख्यांच्या लिलावाचे बीडस् १ डिसेंबर २०२६ रोजी संगणकीय प्रणालीनुसार आरबीआयच्या कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावे लागतील. यामध्ये स्पर्धात्मक बिड्स सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत आणि अस्पर्धात्मक बिड्स सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल त्याच दिवशी रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून २ डिसेंबर २०२६ रोजी बँकेच्या कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी रोखीने, बँकर्स धनादेश, प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा आरबीआय, मुंबई येथील खात्यात देय असलेल्या धनादेशाद्वारे रकमेचे प्रदान केले जाईल.
विविध मुदतीचे व व्याजाचे कर्जरोखे
शासनातर्फे ५ वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे ७.०९ टक्के रोखे २०३१ चे, १३ वर्षे मुदतीचे २००० कोटी रुपयांचे ७.६३ टक्के रोखे २०३९ चे, १७ वर्षे मुदतीचे २००० कोटी रुपयांचे ८.०१ टक्के रोखे २०४३ चे आणि २३ वर्षे मुदतीचे २२०० कोटी रुपयांचे ७.७० टक्के रोखे २०४९ चे विक्रीस काढण्यात आले आहेत. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार एकूण अधिसूचित रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप केली जाईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त १ टक्का रकमेपर्यंतच मर्यादा असेल.
गुंतवणूक आणि परतफेडीचे नियम
या सर्व शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजली जाईल आणि हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील. ५ वर्षे, १३ वर्षे आणि २३ वर्षे मुदतीच्या रोख्यांवर प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी आणि २७ ऑगस्ट रोजी सहामाही पद्धतीने व्याज दिले जाईल. तर १७ वर्षे मुदतीच्या रोख्यांवर प्रतिवर्षी ७ एप्रिल आणि ७ ऑक्टोबर रोजी सहामाही पद्धतीने व्याजाचे प्रदान केले जाईल.
Source: Cosmo News Desk










