Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • एआयमुळे सरकारी सेवा अधिक वेगवान व पारदर्शक होणार
Maharashtra

एआयमुळे सरकारी सेवा अधिक वेगवान व पारदर्शक होणार

मुंबईत पार पडलेली एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह परिषद

मुंबई | कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) सरकारी कामकाजात मोठे बदल घडत असून, नागरिकांना अधिक वेगवान, सोप्या आणि पारदर्शक सेवा देणे शक्य होणार आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘सिटिझन २.० : एआयच्या माध्यमातून वेगवान, स्मार्ट आणि सर्वसमावेशक प्रशासन’ या विषयावरील पॅनल चर्चेत विविध तज्ज्ञांनी नागरी केंद्रित सेवांसाठी एआयच्या वापरासंदर्भात आपले विचार मांडले. या चर्चेचे सूत्रसंचालन डेलॉइट इंडियाचे संचालक वरुण कालरा यांनी केले.

तक्रार निवारण आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर

तेलंगणा सरकारच्या सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष रवी गुप्ता यांनी सांगितले की, कागदपत्रे डिजिटल झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीत. तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यापेक्षा ती सोडविणारी व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात एआयच्या मदतीने नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देता येतील. महाराष्ट्रात ‘महा एआय’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, नियम आणि शासन निर्णयांची माहिती एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. तसेच झारखंडच्या समीरा एस. यांनी पीएम पोषण योजनेत एआयच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आहाराचा साठा आणि आरोग्य तपासणीची माहिती एकत्रित केल्यास त्रुटी वेلेत लक्षात येऊ शकतात. दरम्यान, अभिलाषा अभिनव यांनी स्पष्ट केले की, शिक्षण क्षेत्रात एआय उपयुक्त असले तरी तो शिक्षकांचा पर्याय होऊ शकत नाही. तसेच अरुणाचल प्रदेशचे हरविंदरसिंग यांनी दुर्गम भागातील शिक्षण आणि स्थानिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी एआयच्या उपयोगाबद्दल माहिती दिली.

विविध राज्यांमधील एआयचे यशस्वी प्रयोग

केरळचे जयकृष्णन व्ही. एम. यांनी अन्नधान्य पुरवठा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एआयचा वापर कसा फायदेशीर ठरतो, हे स्पष्ट केले. मागील वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून मागणीचा अंदाज घेतल्यामुळे पुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्षम झाली आहे. गोव्याच्या रेवती कुमार यांनी सरकारी राजपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत एआयच्या वापराचे उदाहरण दिले. नियमांचे प्रशिक्षण दिलेल्या एआयमुळे राजपत्र तयार करण्याची प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करण्याची चाचणी यशस्वी झाली. पिनॅकल टेलिसर्व्हिसेसचे राजेश बॅनर्जी यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा अनुभव सांगितला. आसाममध्ये २२ भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मेघालयात या सेवेमुळे आठ महिन्यांत कर संकलन १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. ओपनटेक्स्टचे राजशेखर चांडी यांनी सरकारी माहितीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. चर्चेचा समारोप करताना वरुण कालरा यांनी सांगितले की, नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर योग्य सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात हेच नव्या प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts