मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी करून दूरदृष्टीने किल्ल्यांची आणि संरक्षण व्यवस्थेची उभारणी केली. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेतून त्यांनी भविष्यातील संघर्षासाठी महत्त्वपूर्ण व्यवस्था निर्माण केली. त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे मुघल सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यानंतर औरंगजेबाच्या दीर्घकालीन दक्षिणेतील मोहिमेला महाराणी ताराराणी यांनी दिलेला प्रतिकार हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मेधा देशमुख-भास्करन यांनी स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सव-२०२६ अंतर्गत ‘स्वराज्य आणि राज्यकारभार’ या विषयावर त्यांचा विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. इतिहासकार वर्षा मुळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न, छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष आणि महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाविरुद्ध उभारलेला लढा हा मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचे या संवादात नमूद करण्यात आले.
तीन पिढ्यांचे नेतृत्व आणि ऐतिहासिक लेखन
नेपोलियन बोनापार्ट यांच्यावर इंग्रजीत अनेक पुस्तके उपलब्ध असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य सांगणारे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता लेखिकेला जाणवली आणि त्यातून त्यांच्या ऐतिहासिक लेखनप्रवासाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेण्यासाठी तत्कालीन मुघल साम्राज्याचा आणि औरंगजेबाच्या सत्तेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेताना त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि लष्करी परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा लागतो. याच अभ्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कार्याचा वेध घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाविषयी बोलताना त्यांनी त्यांच्या रणनीतीचे वेगळेपण अधोरेखित केले. औरंगजेबाच्या प्रचंड सामर्थ्याला सामोरे जाताना महाराणी ताराराणी यांनी केवळ लष्करी सामर्थ्यावर अवलंबून न राहता मानसिक युद्धनीतीचाही प्रभावी वापर केला.
इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी लेखनातील फरक
इतिहास आणि ऐतिहासिक कादंबरी लेखनातील फरक स्पष्ट करताना मेधा देशमुख-भास्करन यांनी सांगितले की, इतिहासकार घटनांची तारीख, काळ आणि संदर्भ नोंदवतात; मात्र कादंबरी लिहिताना त्या काळातील व्यक्तींच्या मनातील विचार, त्यांची देहबोली, संवाद, स्वभाववैशिष्ट्ये आणि निर्णयप्रक्रिया यांचा वेध घ्यावा लागतो. महाराणी ताराराणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लेखन करताना तत्कालीन सामाजिक परिस्थिती, स्त्रियांचे स्थान, राजघराण्यातील जीवन आणि नेतृत्वातील त्यांची भूमिका यांचा अभ्यास करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहेत. इतिहास केवळ घटनांचा क्रम नसून त्या घटनांमागील विचार, नेतृत्व, सामाजिक परिस्थिती आणि मानवी अनुभव समजून घेण्याचे माध्यम आहे, हा विचार या संवादातून अधोरेखित करण्यात आला.
Source: Cosmo News Desk











