मुंबई | पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेले आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालय मुंबईतील लोअर परळ येथील मफतलाल टॉवरमध्ये सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फीत कापून या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे उपस्थित होते. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी करून तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती घेतली.
कार्यालयाची वैशिष्ट्ये आणि सुविधा
या आदर्श सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शासकीय नोंदणी सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, व्यावसायिक ग्राहक सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नियोजित भेटीनुसार नोंदणी प्रक्रिया पार पाडणे, तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती राबवणे, पारदर्शक सेवा देणे, नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे आणि नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे ही या कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याठिकाणी स्वतंत्र स्वागत कक्ष, नागरिक सहायता सेवा, रांग व्यवस्थापन यंत्रणा, आरामदायी प्रतीक्षा कक्ष आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार असून मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया आणि डिजिटल जतन
नियोजित भेटीच्या दिवशी पक्षकारांनी मूळ कागदपत्रे, ओळखपत्रे, भेटीची पुष्टी आणि शुल्क भरल्याच्या पावत्या घेऊन कार्यालयात येणे बंधनकारक आहे. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा कर्मचारी भेटीची वेळ आणि कागदपत्रांची पडताळणी करतात. त्यानंतर स्वागत कक्षातील कर्मचारी प्राथमिक पडताळणी करून रांग व्यवस्थापन प्रणालीद्वारे नागरिकांना टोकन देतात. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांचे अनुक्रमणीकरण, पृष्ठांकन, मुद्रांकन आणि स्कॅनिंग केले जाते आणि ती शासकीय नोंदणी प्रणालीमध्ये अपलोड केली जातात. यामुळे शासकीय अभिलेखांचे सुरक्षित व्यवस्थापन, डिजिटल जतन, अचूक मागोवा आणि भविष्यातील उपलब्धता सुनिश्चित होत असून, स्कॅनिंग आणि गुणवत्ता तपासणीनंतर नोंदणीकृत दस्तऐवज व पोचपावती नागरिकांना रीतसर पोच घेऊन प्रदान केली जातात.
Source: Cosmo News Desk











