नाशिक | अमृतधाम परिसरातील अवघ्या सहा वर्षांच्या स्पंदन सोनार याने आपल्या पिगी बँकेतील पैशांतून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याऐवजी गरजूंच्या मदतीचे स्वप्न साकार केले आहे. लहान मुलांचे विश्व म्हणजे सामान्यतः खेळणी, चॉकलेट, खाऊ आणि आपल्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणे असते. या इच्छा पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या पैशांतून मुले आवडीने पिगी बँकेत रक्कम साठवतात. कधीतरी ती पिगी बँक फोडून आवडीचे खेळणे घ्यायचे किंवा चॉकलेट खायचे, अशी त्यांची स्वप्ने असतात. मात्र, स्पंदनने या सर्व गोष्टी बाजूला सारत राज्यातील दुष्काळग्रस्त आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
दुष्काळाची जाणीव आणि पिगी बँक फोडण्याचा निर्णय
स्पंदन एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याचे आई व वडील ग्रामविकास विभागाशी संबंधित नोकरीत आहेत. त्यामुळे घरात ग्रामीण भागातील दुष्काळाच्या चर्चा कानावर पडत असत. दूरचित्रवाणीवरील बातम्या आणि घरातील चर्चांमधून राज्यातील दुष्काळग्रस्त आणि संकटात सापडलेले नागरिक यांच्याविषयी त्याला माहिती मिळाली. त्यांच्या अडचणी ऐकून त्याचे बालमन अस्वस्थ झाले आणि आपणही अशा लोकांसाठी काहीतरी मदत करू शकतो का, असा निरागस प्रश्न त्याने पालकांना विचारला. मुलाच्या मनात निर्माण झालेल्या या मदतीच्या भावनेला पालकांनीही पूर्ण प्रोत्साहन दिले. त्यानंतर स्पंदनने महिनोमहिने जपून ठेवलेली पिवळी पिगी बँक उघडण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली मदत
पिगी बँकेतून बाहेर आलेल्या नोटा आणि नाणी त्याने एका कागदावर हिशेब लिहून मोजली. त्यात पाचशे रुपयांची एक नोट, दोनशे रुपयांची एक नोट, शंभर रुपयांच्या पाच नोटांसह पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटांचा समावेश होता. तसेच दहा, वीस, पाच, दोन आणि एक रुपयांची नाणीही त्याने जपून ठेवली होती. अशा प्रकारे त्याच्या बचतीतून एकूण १ हजार ६०० रुपये जमा झाले. ही रक्कम घेऊन स्पंदन पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आणि त्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम सुपूर्द केली. या लहानग्या मुलाच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्पंदनच्या निर्णयाचे व सामाजिक जाणिवेचे कौतुक केले आहे.
Source: Cosmo News Desk





