नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहणाचा सोहळा झाल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये नाशिकमधील विकासकामांवरून जोरदार टीका केली आहे. ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून शहरात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला. २०१५ मधील नाशिक कुंभमेळा, उज्जैन कुंभमेळा तसेच प्रयागराज कुंभमेळ्याच्या खर्चाची आकडेवारी त्यांनी मांडली. इतर शहरांमधील कुंभमेळ्यांच्या तुलनेत नाशिकसाठी ठरवण्यात आलेला ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अत्यंत अवास्तव असल्याचे त्यांनी सांगितले. या एकूण खर्चातून तब्बल सात ते आठ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार एकट्या पालकमंत्री आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
रस्त्यांच्या कामांवर आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप
शहरात ३५ हजार कोटींची कामे नक्की कुठे झाली आहेत, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. चांगले रस्ते आणि कामे मुद्दाम उखडून पुन्हा नवीन निविदा काढल्या जात आहेत. निकृष्ट दर्जाची कामे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात १५ ते १६ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माहिती लपवल्यास १० दिवसांच्या आत त्यांची बेनामी संपत्ती आणि कारनामे पुराव्यांसह उघड करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
Source: Cosmo News Desk







