नाशिक | निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी सिटी सेंटर मॉलजवळील उषा किरण सोसायटीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या खळबळजनक प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून, त्यांच्या दुसऱ्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये मालमत्ता आणि राहत्या बंगल्यावरून मोठा वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
खुलासा आणि धमकीचा गंभीर आरोप
दुसऱ्या पत्नीने आपल्या फिर्यादीत धक्कादायक खुलासे केले आहेत. न्यायालयाने खटल्यात गेल्यास ती शेवटची तारीख ठरेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेमंत हेमाडे यांनी पंधरा वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. मात्र, या निर्णयामुळे पहिल्या पत्नीची दोन्ही विवाहित मुले त्यांच्यावर नाराज होती आणि सतत दबाव टाकत होती.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात यश हेमाडे, भाग्यश्री हेमाडे, प्रियंका खोपकर आणि मल्लिकार्जुन उमदी या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकी देण्यासह विविध कलमांनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या त्रासामुळे आणि कोंडीमुळे हेमाडे यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, असा दावा फिर्यादीत करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Source: Cosmo News Desk





