नाशिक | सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य असलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बेकायदेशीर वस्तूंची घुसखोरी रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे समोर आले आहे. कारागृहात सुरक्षा कर्मचाऱ्याकडे चरस सापडल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही, तोच आता एका हवालदाराकडे देशी दारूची बाटली आढळून आली आहे. यापाठोपाठ उघडकीस आलेल्या घटनांमुळे तुरुंगाच्या सुरक्षेवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवालदाराच्या अंगझडतीत सापडली मद्याची बाटली
यादव कचरू जाधव (५७, कारागृह हवालदार) असे देशी दारूची बाटली आढळलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते १० दरम्यान कारागृहातील बराक क्रमांक एकच्या मुख्य प्रवेशद्वारराजवळ हा प्रकार घडला. कारागृह हवालदार नागराज बाबुलाल आहिरे (५६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नियमित तपासणी सुरू असताना यादव जाधव यांची अंगझडती घेण्यात आली, ज्यामध्ये ‘प्रिन्स संत्रा १८० एमएल’ अशी लेबल असलेली देशी दारूची सीलबंद काचेची बाटली मिळाली. कारागृह परिसरात मद्य नेण्यास प्रतिबंध असताना हा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्था आणि अंतर्गत तपासणीवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी रवींद्र एकनाथ पाटील या कारागृह कर्मचाऱ्याकडे चरस हा अमली पदार्थ आढळून आला होता. याप्रकरणी देखील नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद्यांवर शिस्तीचे निर्बंध लादणाऱ्या व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांकडेच प्रतिबंधित वस्तू सापडत असल्याने अंतर्गत तपासणी यंत्रणा कितपत प्रभावी आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रवेशद्वारवरील तपासणी आणि उपाययोजनांचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Source: Cosmo News Desk







