नाशिक | मालेगाव महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारताच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रशासकीय कामकाजाला शिस्त लागावास सुरुवात केली आहे. शनिवारची सुटी असतानाही त्यांनी शनिवारी (दि. ३१) पदभार स्वीकारून सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर महापालिका इमारतीच्या परिसरातील अस्वच्छता आणि भिंतींवर साचलेली जाळी पाहून त्यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कामातून स्वच्छता दिसायला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
महापालिका परिसर स्वच्छ करण्याचे आदेश
विभागप्रमुखांच्या बैठकीनंतर दालनाबाहेर पडलेल्या विसपुते यांना महापालिका आवारात ठिकठिकाणी कचरा आणि इमारतीवर जाळी साचल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. सहायक आयुक्त अनिल पार्कले यांनी सोमवारपर्यंत स्वच्छता करण्याचे सांगितल्यानंतर विसपुते यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले. सोमवारपर्यंत वाट कशाला पाहता? एका तासात परिसर स्वच्छ करा, अशी विचारणा करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासण्याबरोबरच अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी अन्य व्यक्तींकडून कामे करून घेतली जात आहेत का, याची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नियमबाह्य कामांना थारा नाही
मनपाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र जाधव यांना लाचखोरीच्या आरोपातून अटक केली होती. त्यानंतर आयुक्तपद रिक्त झाल्याने प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विसपुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कार्यभाराची सूत्रे स्वीकारताच त्यांनी प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. विभागप्रमुखांच्या बैठकीत विसपुते यांनी कामकाजाचा आढावा घेत नियमांच्या चौकटीतच काम करण्याचे निर्देश दिले. नियमबाह्य कामे केल्यास संबंधितांविरोधात कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Source: Cosmo News Desk







