नाशिक | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत एक मोठी आणि भीषण बाब समोर आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यापासून कुंभमेळ्याचा आरंभ मानला जात असताना, गोदावरी नदी जैविकदृष्ट्या पूर्णपणे मृत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडळाने गोदावरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून दिलेल्या अधिकृत प्रयोगशाला अहवालात पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनची पातळी अक्षरशः शून्य नोंदवली गेली आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, नदीचे पात्र प्रक्रिया न केलेले सांडपाणी, मानवी विष्टा आणि औद्योगिक रसायने वाहून नेणारे गटार बनले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय प्रयोगशालाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोदावरी पात्रातील विविध ठिकाणांहून घेतलेले पाण्याचे नमुने १९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.
प्रदूषणाची गंभीर आकडेवारी आणि रासायनिक प्रमाण
तपोवनातील गोदावरी-कपिला संगम, दसक परिसर आणि टाकळी या तिन्ही मुख्य ठिकाणी विरघळलेला प्राणवायू पूर्णपणे शून्य आढळला आहे. पाण्यात औद्योगिक रसायनांचे प्रमाण दर्शवणारी केमिकल ऑक्सिजन डिमांड तपोवन संगमावर १९६ मिलिग्राम प्रतिलिटर आणि दसक परिसरात १४० मिलिग्राम प्रतिलिटर इतकी घातक आढळली आहे. पाण्यात मलजलाचे प्रमाण दर्शवणारे फिकल कॉलिफॉर्म तपोवन येथे ७० एमपीएन/१०० एमएल, तर संपूर्ण कॉलिफॉर्म २८० एमपीएन/१०० एमएल इतके नोंदवले गेले आहे. प्रक्रिया न केलेले मलजल थेट पात्रात मिसळत असल्याने पाण्यात ई-कोलायसारख्या घातक जिवाणूंचा संसर्ग पसरला आहे. तपोवनातील संगमावर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड तब्बल ८४.० मिलिग्राम प्रतिलिटर नोंदवली गेली असून, सुरक्षित मर्यादा ३ मिलिग्राम प्रतिलिटरपेक्षा ही पातळी २८ पटीने जास्त आहे. याशिवाय दसक परिसरात ५२.० मिलिग्राम प्रतिलिटर, तर टाकळी परिसरात १७.० मिलिग्राम प्रतिलिटर बीओडी नोंदवला गेला आहे. प्राणवायू शून्य होणे हा नदीच्या संपूर्ण जैविक मृत्यूचा पुरावा असून, यात मासे किंवा कोणताही जलचर जिवंत राहणे अशक्य आहे.
आरोग्याचा धोका आणि आगामी सुनावणी
कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गोदावरीच्या पात्रात पवित्र स्नान व आचमन करण्यासाठी येतात, मात्र सध्याचे पाणी स्नानासाठीही अत्यंत घातक बनले आहे. अशा दूषित पाण्यात उतरल्यास त्वचारोग, टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो आणि यकृताचे गंभीर संसर्गजन्य आजार उद्भवण्याचा तीव्र धोका निर्माण झाला आहे. नदी संवर्धन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नाशिक महापालिका आणि संबंधित यंत्रणा गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. या परिस्थितीबद्दल याचिकाकर्ते आणि पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या गोदावरी नदी प्रदूषण याचिकेवर आगामी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी तातडीची सुनावणी होणार असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा संपूर्ण अधिकृत अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी प्रवीण शिलावट यांनी दिली आहे.
Source: Cosmo News Desk






