नाशिक | बागलाण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या कामांचा दर्जा, निधीचा योग्य विनियोग तसेच निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विभागातील संबंधित अभियंतेच प्रत्यक्षात ठेकेदार बनल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, तालुक्यातील रस्ते व विविध बांधकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची दखल घेत दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नाशिक येथे जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा तसेच अधीक्षक अभियंता डी. एस. पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
रस्त्यांची दुरवस्था आणि पुलांची बिकट स्थिती
तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून यामध्ये अंबासन-सारदे, अंबासन-शिवफाटा, अंबासन ते नामपूर-मालेगाव मार्गाला जोडणारा मार्ग, मोराणे-अंबासन आणि करंजाड-निताणे यांसारख्या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय, कंधाणे येथील नदीवरील पुलासह इतर ठिकाणच्या पुलांची काँक्रीट उखडली गेल्यामुळे लोखंडी सळ्या पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विभागामार्फत झालेली कामे, त्यांची मोजमाप पुस्तिका, ठेकेदारांना दिलेली देयके आणि मंजूर निधीचा प्रत्यक्ष विनियोग याची सखोल तांत्रिक व आर्थिक तपासणी करावी. तसेच सर्व कामे ठरलेल्या अंदाजपत्रकानुसारच पूर्ण झाली आहेत किंवा नाही, याची कसून पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मार्गांच्या कामांदरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असून, त्या बदल्यात नेमकी कुठे आणि किती वृक्षलागवड करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निविदा प्रक्रियेची चौकशी आणि आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील विकासाची कामे केवळ ठराविक ठेकेदारांनाच दिले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असल्याने, ऑनलाइन निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कामे करणारी यंत्रणा आणि त्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा स्वतंत्र आहे का, याचीही तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहतात का आणि हालचाल रजिस्टरमध्ये नेमकी कोणती नोंद असते, याचीही चौकशी व्हावी. रस्त्यांवर विनाकारण उभारण्यात आलेले अनावश्यक गतिरोधक ताтаडीने काढावेत आणि नवीन गतिरोधक केवळ शास्त्रशुद्ध पद्धतीने व सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीनेच तयार करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जर या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर आणि ठोस कार्यवाही झाली नाही, तर जनहितासाठी लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. या शिष्टमंडळात शहराध्यक्ष संदीप भामरे, तालुका कार्याध्यक्ष किशोर ह्याळीज, ओबीसी सेल अध्यक्ष दिगंबर सोनवणे, नंदकिशोर सोनवणे आणि हर्षद मगर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk





