नाशिक | रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे अमृत भारत एक्स्प्रेसमधून एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी (दि. १२) फलाट तीनवर ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका तरुणाच्या बॅगेत एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा आढळल्याने रेल्वेस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाला रोकडसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाची विशेष तपासणी मोहीम
छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतलेली असताना एका तरुणाकडे ही रक्कम आढळली. भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड आरपीएफ निरीक्षक एन. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत होती. दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील फलाट तीनवर अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये तपासणी सुरू असताना बॅग घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली आरपीएफ जवानांना संशयास्पद वाटल्या.
यामुळे जवानांनी त्याची चौकशी केली असता, बॅगेतील साहित्याबाबत विचारणा केली असता त्याला उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक लवकुश वर्मा आणि सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव यांनी पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर चलनी नोटा आढळून आल्या. नोटांची मोजणी केली असता ती रक्कम एक कोटी ४८ लाख ६४ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम हस्तगत केल्यानंतर आरपीएफने संदीप बाळासाहेब भामरे (२४, रा. गोमवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. जळगाव) या तरुणाला रकमेसह आयकर विभागाकडे सुपूर्द केले.
रोकड आली कुठून याबाबत तपास सुरू
मोठ्या प्रमाणात रोकड तरुणाकडे कशी आली, तिचा नेमका स्रोत काय आहे आणि ही रक्कम कोणाकडे व कोणत्या कारणासाठी नेली जात होती, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींचा सखोल तपास आता आयकर विभागाकडून केला जाणार आहे. आरपीएफचे नरेंद्र पाडवी, गौतम बिराडे, रवींद्र राठोड यांनी ही कारवाई पूर्ण केली. रेल्वे सुरक्षा दलाच्या सततच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने रेल्वेस्थानकांवरील विशेष तपासणी मोहिमेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
Source: Cosmo News Desk





