Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • अंबडमधील दत्तनगरचा दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी, शुद्ध पाणीपुरवठा सुरू
Nashik

अंबडमधील दत्तनगरचा दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी, शुद्ध पाणीपुरवठा सुरू

नाशिक | अंबड परिसरातील दत्तनगर येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न महापालिका प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांनंतर मार्गी लागला आहे. परिसरात एक हजार ७०० मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकून, १३० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दत्तनगरमधील नागरिकांना आता महापालिकेच्या जलवाहिनीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न

मागील महिन्यात अंबडमधील दत्तनगर परिसरात दूषित पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या समोर आली होती. रासायनिक कंपन्यांचे दूषित पाणी बोरवेलमध्ये मिसळत असल्याने त्याचे पिवळसर आणि रासायनिक घटकयुक्त पाणी येत होते. स्थानिक नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्यामुळे अनेकांना त्वचेचा त्रास सुरू झाला होता आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या गंभीर प्रकाराची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी परिसराची पाहणी केली होती. नागरिकांना तातडीने शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

नवीन जलवाहिनी आणि उपाययोजना

कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अवघ्या आठवडाभरात एक हजार ७०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकून परिसरातील १३० घरे आणि सोसायट्यांना नळजोडण्या देण्यात आल्या. दि. २७ ऑक्टोबरपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील ५० बोरवेल सील करण्यात आल्या असून, आठवडाभरापासून टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा आणि पाण्याच्या टाक्या काढून घेण्यात आल्या आहेत. यामुळे १०० टक्के नागरिकांना महापालिकेच्या जलवाहिनीतून पाणी मिळत असून आरोग्याच्या समस्यांना आळा बसेल असा विश्वास आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts