मुंबई | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी इच्छुक उमेदवारांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. अर्ज करण्यासाठी https://sports.gov.in किंवा क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
को णासाटी आहेत पुरस्कार?
राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार यांचा समावेश आहे. तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देखील हे पुरस्कार प्रदान केले जातात. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांमध्ये सहभागी खेळाडू व व्यक्तींनी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उद्देश आणि अर्ज करण्याचे संकेतस्थळ
पात्र खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय सन्मानाची संधी उपलब्ध करून देणे, हा या पुरस्कारांचा व्यापक उद्देश आहे. इच्छुकांनी विहित मुदतीत म्हणजे २५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी ‘स्पोर्ट्स डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ (https://sports.gov.in) या संकेतस्थळाचा वापर करावा.
Source: Cosmo News Desk










