नाशिक | आदिवासी समाजाचे महानायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली असून, या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला याद्वारे चालना मिळणार असून जिल्हा व तालुकास्तरावर विविध शासकीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
विविध योजनांचे वाटप आणि जनजागृती उपक्रम
या सप्ताहामध्ये १२ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन स्थानिक प्रश्न आणि शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले जातील. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार असून कृषीपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता करून सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाईल. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम, प्रतिमांना माल्यार्पण, महापुरुषांचा गौरव आणि समाजसेवकांचा सन्मान केला जाईल.
आरोग्य, शिक्षण आणि सक्षमीकरण दिन
सप्ताहाच्या पुढील टप्प्यात १६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिराचे आयोजन केले जाईल. यादरम्यान आधार दुरुस्ती, वनपट्टेधारकांना लाभवाटप आणि कागदपत्रांबाबत मार्गदर्शन होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर होणार असून रक्तदाब, मधुमेह, माता-बाल आरोग्य आणि सिकलसेल आजाराबाबत तपासणी व जनजागृती केली जाईल. १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिनानिमित्त सप्ताहाचा समारोप होईल. यादरम्यान महिला बचत गट, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, शिष्यवृत्ती आणि डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले जाईल. संबंधित सर्व शासकीय विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk









