मुंबई | मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित एका विशेष पुस्तक प्रकाशन आणि संवाद सत्रात ॲड. आकाश आंभोरे यांच्या ‘अत्त दीप भव’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात अंजली शेळके यांनी ॲड. आकाश आंभोरे यांच्याशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल आणि विचारांबद्दल माहिती दिली.
बुद्धांच्या विचारांची प्रासंगिकता आणि रशियाचा प्रवास
बुद्धांचे ‘अत्त दीप भव’ हे तत्त्वज्ञान म्हणजे स्वयंप्रकाशित होऊन स्वतःचा मार्ग शोधणे आणि इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे होय, असे मत ॲड. आकाश आंभोरे यांनी व्यक्त केले. आजच्या काळातही हे विचार तितकेच प्रासंगिक असून शांतता आणि समतेसाठी प्रत्येकाने हे तत्त्वज्ञान समजून आचरणात आणले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेडगाव या छोट्या गावातून रशियातील आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभागी होण्यापर्यंतचा आपला प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडला.
प्रेरणादायी अनुभव आणि बाबासाहेबांचे विचार
रशियातील मॉस्को विमानतळावर चलन, मोबाईल नेटवर्क आणि भाषेची अडचण असताना एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने रेड स्क्वेअरपर्यंत केलेला प्रवास, त्या व्यक्तीची माणुसकी आणि भारताविषयीचा आदर हे अनुभव त्यांनी कथन केले. या प्रवासात अण्णाभाऊ साठे यांच्या रशियाविषयीच्या अनुभवांची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आईची शिक्षणाची प्रेरणा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे विकसित झालेले नेतृत्वगुण व आत्मविश्वास आणि पत्नीचे पुस्तक लेखनासाठी मिळालेले प्रोत्साहन यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारूंचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचे सांगत, तरुणांनी बुद्धांचे आचरण करावे आणि बाबासाहेबांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले.
Source: Cosmo News Desk











