मुंबई | महाराष्ट्र आणि बेल्जियममधील व्यापार व गुंतवणूक सहकार्य आता सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, रत्ने-दागिने आणि मायक्रोप्रोसेसर यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये विस्तारणार आहे. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून, दोन्ही प्रदेशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वाढवण बंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सहकार्य
राज्यातील वाढवण बंदर परिसरात प्रस्तावित असलेल्या विशाल बाजारपेठ प्रकल्पाभोवती कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. तसेच अँटवर्प-ब्रुज बंदराच्या धर्तीवर सागरी वाहतूक, बहुपर्यायी दळणवळण, बंदर व्यवस्थापन आणि डिजिटायझेशन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बेल्जियमसोबत सहकार्य वाढवले जाणार आहे.
रत्ने, दागिने आणि पुनर्चक्रण प्रकल्प
नवी मुंबईमध्ये प्रस्तावित असलेल्या रत्ने व दागिने केंद्रासाठी बेल्जियममधील विशेष डिझाइन कौशल्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाईल. याशिवाय कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक, धातू, बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे पुनर्चक्रण या क्षेत्रांमध्येही परस्पर सहकार्य वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk








