Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह
Maharashtra

छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर | क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच आदिवासी संस्कृती आणि जननायकांच्या ऐतिहासिक योगदानाचे जतन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागांच्या समन्वयातून या सप्ताहाची अंमलबजावणी केली जाणार असून, यादरम्यान आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार नोंदणीसारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी विशेष सेवा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

सप्ताहातील विविध कार्यक्रम आणि शिबिरे

सप्ताहाच्या पहिल्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी व प्रचाराचा प्रारंभ होईल, तर १२ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होईल. याशिवाय बीड, लातूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतही पत्रकार परिषदांचे आयोजन केले जाईल. १३ नोव्हेंबर रोजी अंबड तहसील कार्यालयात पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरण व योजनांची माहिती दिली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचे सुशोभीकरण, स्वच्छता आणि वेरूळ येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे झाल्टा फाट्याजवळील आडगाव फाटा येथे मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार येथे कागदपत्रांसाठी सेवा शिबिर, १७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मेळावा व आरोग्य शिबिर होईल, आणि १८ नोव्हेंबर रोजी प्रकल्प कार्यालयात या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.

योजनांचा प्रसार आणि मुख्य उद्देश

या सेवा सप्ताहादरम्यान रक्तदान, आरोग्य तपासणी, पोषणविषयक जनजागृती आणि लाभार्थ्यांना योजनांच्या माहिती पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे. आदिवासी समाजातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना मिळालेल्या शासकीय लाभांची माहिती संकलित केली जाईल. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा चित्रफितींच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर प्रसारित करून योजनांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार असून पारंपरिक कला, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल. शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि आदिवासी अस्मिता व संस्कृतीचे संवर्धन करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कटिबद्ध असल्याचे प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts