जळगाव | दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसोबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी साजरी केली. राज्य शासन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा भावनिक संदेश या माध्यमातून देण्यात आला. राज्यातील मंत्र्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पोखरी तांड्यावर ग्रामस्थांसोबत फराळ
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील बंजारा समाजबहुल पोखरी तांडा येथे ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी ग्रामस्थांसोबत एकाच ताटात दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत त्यांनी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ केले. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी बांधवांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी आणि शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यासाठी हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
परंपरेनुसार स्वागत आणि स्नेहमेळावा
पोखरी तांडा येथे पालकमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. महिलांनी पारंपरिक गीते सादर करून दिवाळीच्या उत्साहात भर घातली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मंत्री आणि ग्रामस्थ यांच्यातील हा स्नेहमेळावा दिवाळीच्या आनंदासोबत सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा प्रत्यय देणारा ठरला.
Source: Cosmo News Desk










