मुंबई | राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना पुढील वर्षाचे पेन्शन सुरळीत चालू ठेवण्यासाठी आवश्यक असणारा हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) देण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागातर्फे (DOPPW) देशभरात १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाचवी देशव्यापी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत देशातील २ हजार शहरे आणि जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू असून, याद्वारे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरबसल्या मोबाईलद्वारे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा
ही मोहीम आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम ठरली आहे. केंद्र सरकारच्या ‘जीवन प्रमाण’ ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ पेन्शनधारकांना आता बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. ते केवळ आपल्या मोबाईलवरून घरबसल्या हे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील अधिदान व लेखा कार्यालयात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आहे.
या देशव्यापी मोहिमेच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी मुंबईतील अधिदान व लेखा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेतला.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि अधिकाऱ्यांचे आवाहन
भेटीदरम्यान गुप्ता यांनी कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखा आणि पेन्शन मदत कक्षाची पाहणी केली. उपस्थित ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ प्रणाली व फेस ऑथेंटिकेशनच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत जीवन प्रमाणपत्र कसे तयार करावे, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या डिजिटल मोहिमेचा फायदा घ्यावा आणि ‘जीवन प्रमाण’ पोर्टलद्वारे आपला हयातीचा दाखला वेळेत सादर करावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk










