नाशिक | त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने अत्यंत मंगलमय आणि धार्मिक वातावरणात सिंहस्थ ध्वजपूजन सोहळा पार पडला. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा महत्त्वाचा धार्मिक विधी संपन्न झाला. यादरम्यान राष्ट्रपतींनी विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि गोदावरी नदीची आरती केली.
कुशावर्त तीर्थावर विविध धार्मिक विधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कुशावर्त तीर्थावर आगमन झाल्यानंतर विधीवत पूजेला सुरुवात झाली. पुरोहितांच्या वैदिक मंत्रघोषात आणि मंत्रोच्चारात राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. यानंतर सिंहस्थ ध्वजाचे पूजन करण्यात आले आणि विशेष अर्घ्य अर्पण करण्यात आले. या सर्व धार्मिक विधींमुळे संपूर्ण कुशावर्त परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेमध्ये या पवित्र स्थळाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मान्यवरांची विशेष उपस्थिती आणि सत्कार
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, जयकुमार रावल, आमदार गोकुळ गीते, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ओमकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान पुरोहित संघाच्या वतीने राष्ट्रपतींना मानद ताम्रपट प्रदान करण्यात आला.
Source: Cosmo News Desk








