सोलापूर | जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे बंधनकारक आहे. शासनाने पुरवलेल्या वैद्यकीय साहित्याचा आणि उपकरणांचा पूर्ण क्षमतेने वापर करून रुग्णांना उत्तम सेवा द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. सोलापूर-सांगली आरोग्य संवाद यात्रेनिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासकीय रुग्णालयांमधील सुविधांचा आढावा आणि पाहणी
बैठकीत जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जनतेच्या मनात शासकीय रुग्णालयांबद्दल विश्वास निर्माण व्हावा, यासाठी दर्जेदार उपचार देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने काम करून गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळवून द्यावेत. ‘माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सेवा संचालक डॉ. कंदेवाड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य व महिला रुग्णालयाला भेट
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा महिला रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅब आणि अतिदक्षता विभागाची पाहणी केली. तसेच जिल्हा रुग्णालयातील आयुष्मान भारत डिजिटल मिशन कक्षाला भेट देऊन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर, जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांच्या आत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Source: Cosmo News Desk











