Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • ओबीसी विभागाच्या भटके-विमुक्त कल्याण अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल
Maharashtra

ओबीसी विभागाच्या भटके-विमुक्त कल्याण अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल

नवी दिल्लीतील समावेशी नीती संकल्प कार्यशाळेत सहभागी झालेले मंत्री व अधिकारी

मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मार्फत भटके-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याशिवाय तृतीयपंथीयांसाठी राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही उपक्रमांची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीन नबीन यांच्या उपस्थितीत देशातील विविध राज्यांच्या सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मंत्र्यांची ‘समावेशी नीती संकल्प’ कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या वतीने या उपक्रमांची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सादर केली. या माध्यमातून वंचित घटकांना शासकीय योजनांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राज्यांच्या मंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे.

पहिली मोहीम आणि ७६ हजार कागदपत्रांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनात या अभियानाची अंमलबजावणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध जिल्ह्यात सुमारे ७६ हजार शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. भटके-विमुक्त समाजातील नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने महसूल व इतर विभागांच्या सहकार्याने ही विशेष मोहीम हाती घेतली. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. या कामाचे व्यापक स्वरूपात दस्तऐवजीकरण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे.

भटके-विमुक्तांच्या विकासाचा व्यापक उद्देश आणि पुढील दिशा

या अभियानाचे स्वरूप केवळ प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित नाही, तर भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील अनुभवावरून अभियानाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आगामी काळात पुढच्या वर्षी ६ ते ८ जानेवारी दरम्यान हे अभियान पुन्हा राबविण्यात येणार आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेले हे निर्णय राज्यासाठी महत्त्वाचे असून, सामाजिक समावेशकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असल्याचे यातून स्पष्ट होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts